गोर बंजारा समाजाचे आमरण उपोषण मागे

गोर बंजारा समाजास महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी पोहरादेवी येथे सुरू झालेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले. हे उपोषण रमेश उर्फ सोनू पवार व सकल बंजारा समाजाने ६ सप्टेंबरपासून सुरू केले होते.

गोर बंजारा समाजाचे आमरण उपोषण मागे

मानोरा: गोर बंजारा समाजास महाराष्ट्रात अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले. रमेश उर्फ सोनू पवार, रा. उमरी खुर्द (ता. मानोरा, जि. वाशिम) आणि सकल बंजारा समाजाने ६ सप्टेंबरपासून पोहरादेवी बंजारा विरासत नंगारा येथे हे उपोषण सुरू केले होते. १११८ च्या हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात होता. त्यावर आधारित आरक्षणाची मागणी अनेक दशकांपासून सुरू आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांमध्ये बंजारा समाजासएसटी आरक्षण लागू आहे.

महाराष्ट्रातील बंजारा बांधव हे भाषा व सामाजिक नात्यांनी त्यांच्याशी जोडलेले असल्याने महाराष्ट्रालाही तोच न्याय मिळावा, अशी या उपोषणाची ठाम मागणी होती. या उपोषणाची दखल कारंजा- मानोरा मतदारसंघाच्या आमदार सईताई प्रकाशदादा डहाके यांनी घेतली. त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी थेट चर्चा केली. 

यावेळी उपविभागीय अधिकारी देवरे, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आमदार डहाके यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्गाने सोडविण्याचे आश्वासन दिले.