डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व सिंचन विषयक विचार | राठोड मोतीराम रूपसिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती, सामूहिक शेती, जलव्यवस्थापन आणि सिंचनविषयक क्रांतीकारी विचार. वाचा राठोड मोतीराम रूपसिंग यांचा सविस्तर लेख.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व सिंचन विषयक विचार | राठोड मोतीराम रूपसिंग
Dr. Babasaheb Ambedkar thoughts on agriculture

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व सिंचन विषयक विचार: एक दूरदृष्टीचा महान दस्तऐवज

लेखक: राठोड मोतीराम रूपसिंग, नांदेड

भारतीय समाजव्यवस्थेचे शिल्पकार, महान अर्थतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे धोरणकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ मानवी हक्कांसाठीच लढा दिला नाही, तर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या शेती आणि सिंचन या क्षेत्रांबाबत अत्यंत सखोल आणि व्यावहारिक विचार मांडले होते. त्यांचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. भारतातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे, ही जाणीव बाबासाहेबांना होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर दूरदृष्टीने उपाय सुचवले. त्यांचे विचार आजही अत्यंत उपयुक्त ठरतात.

भारतीय समाजव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी शेती हा कणा आहे, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशय स्पष्ट होती. त्यांनी केवळ सामाजिक न्यायासाठीच नव्हे, तर आर्थिक समतेसाठीही शेती आणि सिंचन क्षेत्रात मूलभूत बदलांची गरज अधोरेखित केलेली आहे. या महामानवाचे असे मत होते की, भारतातील दारिद्र्य आणि विषमता कमी करण्यासाठी शेतीत सुधारणा आणि प्रभावी जलव्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

१. शेतीतील मूलभूत समस्या आणि विश्लेषण

शेतीत सुधारणा करावयाची असेल तर शेतीतील मूलभूत समस्या शोधणे गरजेचे व महत्त्वाचे आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भारतीय शेतीसमोरील मुख्य अडचणी स्पष्ट केल्या होत्या. त्यांच्या मते, या समस्या सोडवल्याशिवाय शेतीचा सर्वांगीण विकास शक्य नाही. भारतातील शेती ही लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलेली आहे, ही सर्वात मोठी अडचण असल्याचे त्यांनी १९१८ मध्येच त्यांच्या 'स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज' या शोधनिबंधात मांडले होते.

जमिनीचे लहान तुकडे झाल्यामुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहत नाही. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी 'सामूहिक शेती'चा (Collective Farming) पुरस्कार केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी सामूहिक शेतीचा आग्रह धरला. त्यांच्या मते शेतीचे लहान लहान तुकडे एकत्र केल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य होतो. म्हणून त्यांनी सामूहिक शेतीचा आग्रह धरला होता. त्यांच्या मते, लहान-लहान तुकड्यांत शेती करण्याऐवजी सामूहिक शेती करणे फायदेशीर आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते.

२. जमिनीचे राष्ट्रीयीकरण आणि राज्य समाजवाद

जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. जमीन ही खाजगी मालमत्ता न राहता राज्याच्या नियंत्रणाखाली असावी असे मत त्यांनी मांडले. यामुळे शेतकऱ्यांना जमीन वापरण्याचा हक्क मिळेल आणि सर्वांना समान संधी मिळेल. मोठ्या जमीनदारांकडे जास्त जमीन आणि गरीब शेतकऱ्यांकडे कमी जमीन ही विषमता यामुळे कमी होईल.

एकत्रित शेती केल्यामुळे आधुनिक यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे होईल, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. उदाहरणार्थ, गावातील १० शेतकरी एकत्र येऊन एकाच मोठ्या शेतात शेती करतील, तर ट्रॅक्टर, पंप यांचा वापर अधिक परिणामकारक करता येईल आणि मजुरी खर्च कमी होईल. एकत्रित शेती केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणेही सोपे होईल. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज आणि आर्थिक सहाय्य मिळणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. एकत्रित शेतीमुळे सावकारांवरील अवलंबित्व कमी करता येईल. शेतकऱ्यांना सरकारी बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास शेतकरी उत्तम बियाणे, खत आणि आधुनिक उपकरणे खरेदी करू शकतो.

३. आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञान

बाबासाहेबांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला. सुधारित बियाणे, यांत्रिकीकरण, वैज्ञानिक शेती, ट्रॅक्टर, पंप, आणि ड्रिप सिंचन वापरल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. डॉ. आंबेडकरांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा विचार मांडला, कारण त्यांच्या मते जमीन ही राज्याच्या ताब्यात असावी आणि शेतकऱ्यांना सामूहिक पद्धतीने शेती करण्याची संधी द्यावी. जर गावातील सर्व जमीन एकत्र करून सहकारी पद्धतीने शेती केली, तर उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल, हा त्यांचा विश्वास होता.

४. औद्योगिकीकरण आणि शेतीचा संबंध

आंबेडकरांच्या मते, केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक विकास मर्यादित राहतो. त्यामुळे औद्योगिकीकरण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे शेतीवरील दबाव कमी होतो. जर गावात कारखाने उभे राहिले, तर काही लोकांना शेतीऐवजी उद्योगात रोजगार मिळेल आणि शेतीवरील लोकसंख्येचा ताण कमी होईल.

डॉ. आंबेडकरांनी औद्योगिकीकरणाला शेतीच्या विकासाशी जोडले. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी उद्योग आवश्यक आहेतच. पर्यायी रोजगार निर्मितीमुळे शेतीवरचा ताण कमी होतो. त्यांच्या मते, सर्व लोक शेतीवर अवलंबून राहू नयेत. उद्योगधंदे वाढवले तर रोजगार वाढेल आणि शेतीवरील ताण कमी होईल. काही लोक उद्योगात काम करू लागल्यास शेतीत स्पर्धा कमी होईल आणि शेतीतील मजुरांनाही योग्य मजुरी मिळेल.

५. शेतकऱ्यांचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण

डॉ. बाबासाहेबांचे मत होते की शेतकऱ्यांचा सामाजिक दर्जा उंचावणे आवश्यक आहे. त्यासाठी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा, आधुनिक साधने, यंत्रसामग्री आणि वैज्ञानिक पद्धती वापरण्याचा आग्रह त्यांनी धरला. यामुळे उत्पादनात वाढ होईलच, पण त्यासोबतच कामाचा वेळ आणि श्रम कमी होईल, ज्यामुळे शेतकरी आणि शाश्वत शेती यांचा विकास होईल.

शिक्षण हा विकासाचा पाया आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिक्षित शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारू शकतो आणि अधिक प्रगती करू शकतो, असे त्यांचे स्पष्ट विचार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या काळातही महत्त्वाचे आहेत. शासन आज राबवत असलेल्या योजना जसे की जलसंधारण, ठिबक सिंचन, सामूहिक शेती, आणि शेतीचे यांत्रिकीकरण हे सर्व उपाय डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत आहेत.

६. सिंचन आणि जलव्यवस्थापन: एक दूरदृष्टी

डॉ. आंबेडकरांनी शेती विकासासाठी सिंचनाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पावसावर अवलंबून असलेली शेती अस्थिर असते. शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचन सुविधा आवश्यक आहेत. त्यांनी मोठी धरणे, कालवे आणि जलसंधारण प्रकल्पांचा पुरस्कार केला.

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये जलसंपत्तीचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी खालील मुख्य सूत्रे सुचवली:

  1. पाण्याचे नियंत्रण पूर्णपणे सरकारकडे असावे.

  2. जलवाटप न्याय्य आणि नियोजनबद्ध असावे.

यामुळे सर्व शेतकऱ्यांना समान पाण्याचा लाभ मिळू शकतो. शेतीसाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरणे, कालवे, विहिरी यांचा विकास झाल्यास व पाण्याचे समान वितरण, सिंचनाची सोय असल्यास दुष्काळातही पिके वाचू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिंचनाला शेतीच्या विकासाचा आधारस्तंभ मानले. त्यांनी जलसंपत्तीचा योग्य वापर करण्यावर भर दिला. पावसावर अवलंबून शेती असलेल्या भागात दुष्काळ पडल्यास पिके नष्ट होतात; पण धरणे, कालवे आणि विहिरी असल्यास शेतकऱ्यांना वर्षभर पाणी मिळू शकते.

७. बहुउद्देशीय प्रकल्प आणि 'नदी खोरे' विकास

त्यांनी बहुउद्देशीय धरणे आणि जलप्रकल्प उभारण्यावर विशेष भर दिला. त्यांनी नदीजोड प्रकल्प आणि जलव्यवस्थापनाच्या योजनांना पाठिंबा दिला. धरणामुळे केवळ शेतीसाठीच नव्हे, तर वीज निर्मिती आणि पिण्याच्या पाण्याची सोयही होते. तसेच पूर नियंत्रण करता येते. जलव्यवस्थापन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका शासनाकडे मांडलेली होती. शासनाने जलसंपत्तीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी पाणी हे सार्वजनिक संपत्ती मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलसंपत्ती विकास होण्यासाठी मोठी धरणे आणि बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प यांचा जोरदार पुरस्कार केला. ते थेट एखाद्या विशिष्ट प्रकल्पाचे “निर्माते” नसले तरी त्यांनी मांडलेल्या धोरणांमुळे भारतात अनेक मोठ्या सिंचन व जलप्रकल्पांची उभारणी शक्य झाली. विशेषतः ते वायसरॉयच्या कार्यकारी मंडळावर असताना (Labour Member, 1942–46) त्यांनी जलनीती, नदीखोरे विकास आणि धरणांच्या संकल्पना पुढे नेल्या.

त्यांच्या विचारांमधून प्रेरित होऊन भारतात पुढील महत्त्वाचे सिंचन प्रकल्प उभारले गेले:

  • दामोदर व्हॅली प्रकल्प: हा प्रकल्प अमेरिकेतील TVA (Tennessee Valley Authority) च्या धर्तीवर राबवला गेला.

  • महानदीवरील हिराकुड धरण: हिराकुड प्रकल्प हा भारतातील पहिल्या बहुउद्देशीय प्रकल्पांपैकी एक आहे. याचा मुख्य उद्देश पूर नियंत्रण, सिंचन आणि वीज निर्मिती हा होता. डॉ. आंबेडकरांनी हा प्रकल्प सुचवला होता, जे आज जगातील मोठ्या धरणांपैकी एक आहे.

  • भाक्रा नांगल धरण: पंजाब आणि हरियाणाच्या विकासात या धरणाचा मोठा वाटा आहे.

  • सोन नदी प्रकल्प आणि नर्मदा नदी प्रकल्प: असे अनेक प्रकल्प त्यांनी शासनाला सुचविले.

डॉ. आंबेडकरांच्या जलनीतीमुळे अशा मोठ्या प्रकल्पांना चालना मिळाली. याबरोबरच या धरणांचा भारताच्या 'हरित क्रांतीत' फार मोठा वाटा आहे. आज जलसिंचनासाठी त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. शासनाच्या नदी खोरे विकासाच्या कामावर डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेचा प्रभाव आहे. मोठ्या नदी प्रकल्पांच्या कल्पनेचा विस्तार आणि तुंगभद्रा प्रकल्प (कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसाठी महत्त्वाचा) हे सर्व प्रकल्प महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिपाक आहेत.

८. निष्कर्ष: एक शाश्वत दिशा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे” ही भूमिका मांडली. त्यांनी नदी खोरे विकास, बहुउद्देशीय धरणे आणि केंद्रीयकृत जलव्यवस्थापन यावर भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतकऱ्यांसाठीचे विचार हे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि तांत्रिक सुधारणांवर आधारित होते. त्यांनी समता, आधुनिकता आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधणारा मार्ग दाखवला.

आजही त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते आणि भारतीय शेती अधिक सक्षम बनू शकते. आज भारतातील बहुतांश मोठे सिंचन प्रकल्प हे त्यांच्या दूरदृष्टीच्या धोरणांचेच परिणाम आहेत. त्यांच्या विचारांमुळे शेती अधिक स्थिर, उत्पादनक्षम आणि आधुनिक बनण्यास मदत झाली. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती आणि सिंचनविषयक विचार केवळ तात्कालिक नव्हते, तर ते दीर्घकालीन विकासाची दिशा दाखवणारे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व सिंचन विषयक विचार आजही अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांनी शेतीचे आधुनिकीकरण, जलसंपत्तीचा योग्य वापर आणि सामूहिक शेती यावर भर देऊन भारतीय शेतीच्या विकासाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते आणि देशाची आर्थिक प्रगती साधता येईल.

या महामानवाच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!