सिंधूजनांची आद्यगणमाता निर्ऋती आणि गोरमाटी समाजातील दवाळी | गोरमाटी संस्कृती
गोरमाटी गणसमाजातील दवाळी, आद्यगणमाता निर्ऋती, सिंधू संस्कृती, मेरा मांगेरो, काळी मावस आणि गोरमाटी परंपरांचा सखोल अभ्यास.
सिंधूजनांची आद्यगणमाता ‘निर्ऋती’ हीच गोरमाटी गणसमाजाची ‘दवाळी मावली’
दिवाळीच्या सणात गोरमाटी समाजातील मूली आजही प्रार्थना करतात —
“आनधान लावालसकर देस ये दवाळी मावली..!”
या इन्ती स्तोत्रातील ‘दवाळी मावली’ म्हणजे अन्नधान्याची समृद्धी देणारी भूमाता — निर्ऋती होय.
ज्येष्ठ अभ्यासक अशोक राणा यांच्या मते, “सिंधूजनांची आद्य गणमाता निर्ऋतीच्या उपासनेचा उत्सव म्हणजे दिवाळी.” हे मत गोरमाटी संस्कृतीतील दिवाळी परंपरेला तंतोतंत लागू पडते.
निर्ऋती ही काळ्या वर्णाची देवता मानली जाते. गोरमाटी समाज दिवाळीच्या अमावस्येला ‘काळी मावस’ असे संबोधतो. गोरमाटी भाषेतील हे नाव निर्ऋतीच्या वर्णाशी संबंधित असल्याचे दिसून येते.
गोरमाटी गणसमाज निर्ऋतीला आपली आद्य गणमाता मानतो. वर्षातून तीन वेळा तांड्यात जोंधळ्याच्या पिठाने चौकोनी चिन्ह रेखाटून सामूहिक पूजा केली जाते. या विधीला ‘समनक’ असे म्हणतात.
गोर स्त्रियांच्या ‘नातरो’ या मौखिक वाङ्मयातील पहिले नमनही ‘नेरती’ म्हणजे निर्ऋतीलाच अर्पण केलेले आहे —
“पेलो मडो ये नाम ये मारे नेरतीरो लेस्याये..
नेरतीपर नीपजी हारीया मूंग मसूर ये..!”
अशा अनेक मौखिक परंपरा आजही गोर स्त्रियांनी जपून ठेवल्या आहेत. यावरून गोरमाटी गणसमाजाचे सिंधू संस्कृतीशी असलेले सांस्कृतिक नाते स्पष्ट होते.
ऋग्वेदातील पृथ्वीमातेवरील सूक्ते आणि गोरमाटी संस्कृतीतील आरदास यामध्येही आशयात्मक साम्य दिसते. “पृथ्वी अन्नधान्याने समृद्ध होवो” ही वैदिक प्रार्थना आणि गोरमाटी आरदासमधील “सेरेर सव्वासेर कर याडी” हा चरण यांच्यात समान भावार्थ आढळतो.
आर्यपूर्व काळापासून गोरमाटी गणसमाज शेती आणि लदेणी व्यवसाय करत सुखी व संपन्न जीवन जगत होता. त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीचा प्रभाव पुढे आर्य संस्कृतीवर पडणे स्वाभाविक होते. कारण आर्य हे मूलतः भूमीपूजक नव्हते, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
निरज साळुंखे यांच्या मते, वैदिक आर्यांनी “राक्षसांची लक्ष्मी निर्ऋती” अशी कबुली दिलेली आढळते. त्यामुळे गोरमाटी समाजातील दवाळी हा भूमाता निर्ऋतीच्या उपासनेचा उत्सव मानणे अतिशयोक्ती ठरत नाही.
काॅ. शरद पाटील यांच्या मते —
“निर्ऋती ही सिंधूची उद्गाती, स्त्रीराज्याची पहिली राणी आणि पुढे मातृदेवता बनलेली भूमाता होती.”
‘मेरा मांगेरो’ : भूमातेप्रती कृतज्ञतेची परंपरा
दिवाळीच्या काळी मावस रात्री गोर मूली हातात पणत्या घेऊन तांड्यातील प्रत्येक घरी जातात आणि —
“याडी तोनं मेरा… बापू तोनं मेरा…!”
असे म्हणत सामूहिकरीत्या ‘मेरा’ मागतात. या परंपरेला ‘मेरा मांगेरो’ असे म्हणतात.
डाॅ. के. बी. पवार यांच्या ‘हाम गोर : हमार गोर बोली’ या ग्रंथानुसार ‘मेर’ म्हणजे जकात किंवा भूमीचे ऋण.
मेहरगड संस्कृतीत शेतीचा शोध लागल्याचे पुरावे आहेत. काॅ. शरद पाटील यांच्या मते, गाळपेर शेतीचा शोध निर्ऋतीने लावला. म्हणूनच भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मेरा’ मागण्याची प्रथा निर्माण झाली असावी.
गोरमाटी समाजात अशी धारणा आहे की, भूमीचे ऋण फेडल्याशिवाय मृत व्यक्तीचा आत्मा नैसर्गिक घटकांत विलीन होत नाही. म्हणून मृताच्या धोतराच्या किंवा ओढणीच्या पदराला बांधलेला रुपयाचा ‘बंदा’ जमिनीत पुरला जातो. यास ‘मेरेर रपीया’ म्हणतात.
मेर चुकवल्यानंतर तिरडीची दिशा बदलली जाते. प्रेताचे पाय तांड्याकडे आणि डोके स्मशानभूमीकडे ठेवले जाते. ही प्रथा सिंधू संस्कृतीतील अंत्यसंस्कार पद्धतीशी साधर्म्य दर्शवते.
सिंधू संस्कृती आणि गोरमाटी परंपरा
सिंधू संस्कृती ही इ.स.पू. ३३०० ते १३०० या काळातील प्राचीन नागरी संस्कृती होती. तिचा विस्तार आजच्या अफगाणिस्तानापासून पाकिस्तान आणि वायव्य भारतापर्यंत होता. शोर्तुगाई आणि मुंडीगाक ही अफगाणिस्तानातील सिंधू संस्कृतीची महत्त्वाची स्थळे मानली जातात.
इतिहासकार सर जॉन मार्शल यांच्या मते, सैंधव संस्कृतीतील लोक कास्य धातूचा वापर करीत. गोरमाटी समाजात आजही कास्य धातूच्या भांड्यांचा विशेष धार्मिक व सामाजिक संदर्भ आहे.
गोरमाटी समाजातील एक पारंपरिक प्रश्न —
“आपण से आयी जात छो कांयी?”
याचा अर्थ — “आपण सारे नागवंशीय आहोत काय?” असा होतो.
वैदिक वाङ्मयात आर्यांच्या शत्रूंना ‘पणि’ म्हटलेले आहे. गोरमाटी भाषेतील ‘पेनाती’ या शब्दातही त्याच ध्वनीचा संदर्भ दिसतो.
प्र. रा. देशमुख यांच्या मते, पणि हे नागवंशीय होते आणि ते डोक्यावर शिंग धारण करीत. सिंधू संस्कृतीतील मुद्रांवरही शिंगधारी देवतांची चिन्हे आढळतात. आजही गोर स्त्रिया आपल्या पारंपरिक वेशभूषेत शिंगाकृती शिरोभूषण धारण करतात.
हरप्पा उत्खननात सापडलेल्या शिंगधारी स्त्रीमुद्रा आणि गोर स्त्रियांची परंपरा यामध्ये सांस्कृतिक साम्य दिसते.
भाषा, बोली आणि सिंधू संस्कृती
मोहेंजोदडो परिसरातील ‘डोकरी’ आणि ‘ओकरा’ यांसारखी नावे गोरमाटी भाषेशी साम्य दर्शवितात. तसेच गोरमाटी बोलीतील षष्ठी विभक्तीचे प्रत्यय नेपाळ, बांगलादेश आणि भारतीय उपखंडातील काही भाषांशी मिळतेजुळते आहेत.
‘सिंधु घाटी सभ्यता का इतिहास’ या ग्रंथाचे लेखक पु. श्री. सदार यांच्या मते, सिंधू लिपीची भाषा ‘सहा खडीची’ होती. तांड्यातील डायसाण/डायीसाणी आजही सहाखडीसदृश भाषाशैलीत बोलताना दिसतात.
दुर्दैवाने सिंधू लिपी अजून पूर्णपणे उलगडलेली नाही. परंतु भविष्यात ती ज्या भाषेत वाचली जाईल, ती भाषा गोरमाटीशी संबंधित असू शकते, असा अनेक अभ्यासकांचा तर्क आहे.
निष्कर्ष
गोरमाटी गणसमाजातील दवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नसून भूमाता निर्ऋतीच्या उपासनेचा आणि भूमीप्रती कृतज्ञतेचा उत्सव आहे. सिंधू संस्कृतीतील अनेक प्रथा, श्रद्धा, प्रतीके आणि जीवनपद्धती आजही गोरमाटी समाजात जिवंत स्वरूपात टिकून आहेत.
जर सर जॉन मार्शल यांनी तांड्यांतील जीवनपद्धती जवळून पाहिली असती, तर त्यांनी कदाचित सिंधू संस्कृतीला “गोरमाटी गणसमाजाची प्राचीन शिंगी संस्कृती” असे संबोधले असते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
संदर्भ
- सिंधूजनांची मातृदेवता निर्ऋती — अशोक राणा
- सिंधु घाटी सभ्यता का इतिहास — पु. श्री. सदार
- गोरमाटी बोलीभाषा वाङ्मय व कलांचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र — भीमणीपुत्र
- दैत्य बळी कुंतल देश महाराष्ट्र — निरज साळुंखे
- विकिपीडिया
- हाम गोरमाटी : हमार गोरबोली — डाॅ. के. बी. पवार
— भीमणीपुत्र (मोहन गणुजी नायक)