जागतिक पुस्तक दिन विशेष: वाचन थांबलं, आदर्श कसे घडतील? | प्रा. डॉ. सुभाष राठोड
जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि आजच्या डिजिटल युगातील आव्हाने यावर प्रा. डॉ. सुभाष राठोड यांचा विशेष लेख. वाचा पुस्तकांचे महत्त्व आणि आदर्श पिढी घडवण्यातील वाचनाचा वाटा.
२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन विशेष: वाचन थांबलं, आदर्श कसे घडतील?
— प्रा. डॉ. सुभाष राठोड
मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ज्ञानाचा सतत चालू असलेला प्रवाह. या प्रवाहाला दिशा देणारे, त्याला साठवून ठेवणारे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक. काळ बदलला, साधने बदलली, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले; तरीही विचारांची मांडणी, अनुभवांची देवाणघेवाण आणि ज्ञानाची परंपरा जपण्याचे कार्य आजही पुस्तकांद्वारेच प्रभावीपणे घडते. आजच्या डिजिटल युगात माहितीचा महापूर ओसंडून वाहत असला, तरी ज्ञानाची खरी खोली आणि चिंतनाची सखोलता पुस्तकांतच सापडते. म्हणूनच वाचनसंस्कृती जपणे आणि वाढवणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी ठरते. या जाणिवेला अधोरेखित करण्यासाठी आणि पुस्तकांचे, लेखकांचे तसेच वाचनाचे महत्त्व जगभर पोहोचवण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. युनेस्कोच्या पुढाकारातून सुरू झालेला हा दिवस केवळ उत्सव नसून, विचारांना चालना देणारा आणि आत्मपरीक्षणाची संधी देणारा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आहे.
या पार्श्वभूमीवर पुस्तकांचे महत्त्व, वाचनसंस्कृतीचे बदलते स्वरूप आणि आजच्या काळातील त्याची आवश्यकता यांचा वेध घेणारा हा लेखनप्रपंच...
पुस्तकांचा वारसा आणि जागतिक पुस्तक दिनाचा उगम
माणूस जन्मतः ज्ञानी नसतो; पण त्याच्यात विचार करण्याची, समजून घेण्याची आणि स्वतःला घडवण्याची अद्भुत क्षमता असते. या क्षमतेला आकार देणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तक. म्हणूनच या ज्ञानसंपदेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. युनेस्कोने १९९५ साली या दिवसाची घोषणा केली. ‘जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश वाचनसंस्कृती रुजवणे, प्रकाशन क्षेत्राला चालना देणे आणि लेखकांच्या सर्जनशील कार्याचा सन्मान करणे हा आहे.
जागतिक पुस्तक दिन हा प्रामुख्याने ख्यातनाम साहित्यिक, प्रसिद्ध नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर, स्पॅनिश साहित्यातील दिग्गज लेखक मिगेल डी सर्व्हांटिस, जोसेफ प्ला आणि इनसा गार्सिलासो दे ला वेगा यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या स्मृतींशी निगडित आहे. विशेष म्हणजे, या थोर लेखकांची जन्म किंवा मृत्यू तिथी २३ एप्रिल याच दिवशी येते. या जागतिक साहित्यातील योगदानाला अनोखी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून घोषित केला आहे.
हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. स्पेनमध्ये मिगेल डी सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिस येथे युनेस्कोची सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये अर्थात वाचणामध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. वाचनसंस्कृतीच्या चिंतनाशिवाय पुस्तकदिन अपूर्णच राहतो; चला तर मग, पानोपानी लपलेल्या, शब्दांच्या या पवित्र विश्र्वात डोकावत, वाचनाच्या संस्कारांची आणि पुस्तकदिनाच्या सार्थतेची एक अर्थपूर्ण चर्चा करूया.
डिजिटल युगाचे आव्हान आणि वाचनाची ओहोटी
आजच्या वेगवान युगात, मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झंझावातात आपण तांत्रिकदृष्ट्या जितके जवळ आलो आहोत, तितकेच संवादाच्या पातळीवर दुरावत चाललो आहोत. या आभासी विश्र्वाच्या गलबल्यात एक अस्वस्थ करणारी पोकळी निर्माण झाली आहे, ती म्हणजे समृद्ध 'वाचनसंस्कृती'ची लागलेली ओहोटी. अक्षरांशी जडलेले नाते आणि ग्रंथांमधून मिळणारा विचारांथ प्रगल्भ वारसा आता डिजिटल पडद्यांच्या लखलखाटात हरवत चालला आहे.
एकेकाळी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असायची, त्यांच्या डोळ्यांत कुतूहल असायचं, आणि मनात ज्ञानाची भूक असायची; पण आज तीच पिढी स्क्रीनवर स्क्रोल करण्यात गुंतलेली दिसते. पूर्वी गजबजलेली वाचनालये आज ओस पडत चालली आहेत, ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागी न हलता शांतपणे वाचकांची वाट पाहत उभी आहेत. साहित्य संमेलनांमध्येही पुस्तकांची विक्री घटताना दिसते. हे चित्र केवळ चिंताजनक नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक संकटाची चाहूल देणारे आहे.
ज्ञानाच्या वाटेवरून स्क्रीनच्या वाटेवर, सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरत चालले आहेत. तात्काळ मनोरंजनाच्या आहारी गेलेली ही पिढी विचार करण्याऐवजी पाहण्यात आणि पुढे सरकण्यात रमू लागली आहे. परिणामी, चिंतनशील वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. पण याच क्षणी आपण जरा थांबून विचार करायला हवा. ज्ञान हीच खरी शक्ती आहे, हे आपण विसरत तर नाही ना?
वाचन: व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया
वाचनामुळेच आपल्याला इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी मिळते. सातत्याने वाचन केल्याने ग्रहणशक्ती वाढते, स्मरणशक्ती सशक्त होते आणि बुद्धिमत्ता प्रगल्भ बनते. वाचन हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे मूलभूत साधन आहे; ते त्याला सुसंस्कृत, विवेकशील आणि संवेदनशील बनवते. परंतु जर वाचनच कमी झाले तर पुस्तकांना स्थान उरणार का? वाचन हरवले, तर विचारांचे काय? पानोपानी दडलेले जीवनाचे अर्थ कसे उलगडतील? चरित्रे न वाचता कसे घडतील आदर्श? वाचनाविना मूल्यांची उभारणी? वाचनाविना नैतिकता येणार कुठून? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
चांगले वाचन आणि उत्तम विचार यांच्या सहवासातून मनाची शुद्धी होते, भाषेची समृद्धी वाढते आणि वक्तृत्वाला धार येते. वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर ती जीवनाला उन्नत करणारी साधना आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुस्तकांचा सहवास अत्यंत प्रभावी ठरतो. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - “पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते, आणि सशक्त मस्तक कोणासमोरही नतमस्तक होत नाही.”
स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, भगतसिंग यांसारख्या महापुरुषांच्या जीवनाला वाचनानेच नवी दिशा दिली. ऐतिहासिक पुस्तकांमुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होते, कादंबऱ्यांमधून माणुसकीचा भाव फुलतो, कवितांमधून संवेदनशीलता निर्माण होते, तर चरित्रांमधून प्रेरणा मिळते. वर्तमानपत्र वाचनातून सामाजिक जाणीव विकसित होते. एकूणच, वाचन माणसाला सर्वगुणसंपन्न बनवते आणि नैतिक मूल्यांची पायाभरणी करते.
काळाची गरज: वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन
आज वाचनाच्या अभावामुळे समाजातून नैतिक मूल्ये हरवत चालली आहेत. त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचनसंस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. “वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे तरुण पिढीला वाचवायचे असेल, तर त्यांच्या मनात वाचनाची गोडी रुजवणे अत्यावश्यक आहे. यासाठी ‘जागतिक पुस्तक दिन’सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. युनेस्कोच्या पुढाकाराने १९९५ पासून साजरा होणारा हा दिवस वाचन, लेखन, प्रकाशन आणि कॉपीराइटच्या मूल्यांना उजाळा देतो. हा दिवस आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देतो. आपण स्वतः वाचतो का? आणि इतरांना वाचनासाठी प्रेरित करतो का?
आजच्या डिजिटल युगात पुस्तकांपासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढली असली, तरी याच युगात वाचनसंस्कृती पुनर्जीवित करण्याच्या असंख्य संधीही उपलब्ध आहेत. यासाठी शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, स्थानिक संस्था आणि शासन यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. खालील काही नावीन्यपूर्ण उपक्रम या दिशेने दिशादर्शक ठरू शकतात:
१. पुस्तक दान चळवळ: या माध्यमातून जुनी पण दर्जेदार पुस्तके संकलित करून ती ग्रामीण भागातील किंवा दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवता येतील. २. ‘मी वाचलेले पुस्तक’ सादरीकरण: शाळा-महाविद्यालयांतून अशा स्पर्धा किंवा उपक्रम घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये चिंतन आणि अभिव्यक्तीची सवय वाढेल. ३. ‘एक दिवस – एक लेखक – एक पुस्तक’: या उपक्रमाद्वारे विविध प्रथितयश आणि नव्या दमाच्या साहित्यिकांची ओळख वाचकांना करून देता येईल. ४. भिंतीवरचे पुस्तक (Wall Library): सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळांच्या आवारात भिंतीवर आकर्षकरीत्या पुस्तके उपलब्ध करून देणे. ५. ग्रंथदिंडी आणि वाचन सहवास तास: सामूहिक वाचनातून वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. ६. कथाकथन शिबिरे: लहान मुलांना गोष्टींच्या रूपाने पुस्तकांच्या जगाची ओळख करून देणे. ७. साहित्यिकांशी संवाद: प्रत्यक्ष लेखक जेव्हा वाचक किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, तेव्हा लिहिण्या-वाचण्याची ओढ वाढते.
शासनाची भूमिका आणि डिजिटल साधने
वाचन चळवळीला गती देण्यासाठी शासनाचे धोरणात्मक प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. शासनाने ‘वाचन प्रेरणा अभियान’ अधिक व्यापक स्वरूपात राबवले पाहिजे. ग्रंथालयांसाठी विशेष निधीची तरतूद, ‘वाचन दूत’ संकल्पनेचा विस्तार आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात पूरक वाचनसूचीचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, ‘वाचनग्राम’ पुरस्कार देऊन ग्रामीण भागात वाचनाचे वातावरण तयार करणाऱ्या गावांचा गौरव व्हायला हवा.
आजच्या तंत्रज्ञानाचा तिरस्कार करण्याऐवजी त्याचा वापर वाचनासाठी कसा करता येईल, हे पाहिले पाहिजे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, राष्ट्रीय ई-पुस्तकालय, ग्रंथम (Grantham), शोधगंगा, दीक्षा, ई-बालभारती यांसारख्या डिजिटल साधनांचा प्रसार वाढवणे आवश्यक आहे. यामुळे वाचन अधिक सुलभ, आकर्षक आणि सर्वसमावेशक होईल. ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्सच्या माध्यमातून प्रवासात किंवा फावल्या वेळातही वाचन करता येऊ शकते.
साहित्याची ताकद आणि मानवी जीवन
जागतिक पुस्तक दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, तो वाचनसंस्कृतीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. स्पेनमध्ये या दिवशी गुलाब आणि पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते. हा एक अत्यंत सुंदर संस्कार आहे. आपल्याकडेही अशाच पद्धतीने पुस्तकांचे आदानप्रदान, बुक फेअर्स, लेखक भेटी आणि कथाकथन कार्यक्रमांतून वाचनाचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे.
माणसाला माणूस म्हणून घडवण्याची ताकद केवळ साहित्यात असते. जेव्हा एखादा वाचक पुस्तक हातात घेतो, तेव्हा तो केवळ शब्द वाचत नाही, तर तो एका नव्या संस्कृतीशी, एका वेगळ्या विचारधारेशी आणि प्रगल्भ अशा जीवनदृष्टीशी एकरूप होत असतो. कठीण काळात जगण्याला उभारी देणारे, वैचारिक गोंधळात दिशा दाखवणारे आणि कोरड्या होत चाललेल्या मनात संवेदनशीलतेचा पाझर फोडणारे पुस्तक हे एक अमोघ माध्यम आहे.
इतिहास साक्ष आहे की, ज्या समाजाने पुस्तकांचा हात धरला, तो समाज वैचारिकदृष्ट्या प्रगत झाला. ज्यांनी वाचन सोडले, ते समाज अंधश्रद्धा, संकुचित विचार आणि अज्ञानाच्या अंधारात अडकून पडले. पुस्तके हे ज्ञानाचे दिवे आहेत, जे पिढ्यानपिढ्या तेवत राहतात.
समारोप
आजच्या आभासी जगात पुस्तकेच आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जोडून ठेवतात. ती केवळ माहितीचा स्रोत नसून विचारांवर संस्कार करणारी आणि माणसाला प्रगल्भ बनवणारी शक्ती आहे. कोणत्याही समाजाची प्रगती ही केवळ भौतिक सुखांवरून किंवा आर्थिक विकासावरून मोजली जाऊ नये, तर तिथल्या समृद्ध 'वाचनसंस्कृती'वरून मोजली गेली पाहिजे.
वाचन ही एक मूक क्रांती आहे. ती हळूहळू माणसाच्या अंतरंगात बदल घडवून आणते. पुस्तक हे केवळ मस्तक घडवणारे साधन नसून, माणुसकी जपणारे एक संजीवनी अमृत आहे. जर आपण आज वाचले नाही, तर उद्याचे आदर्श कसे घडतील? मूल्ये कशी जपली जातील? आणि पुढच्या पिढीला आपण कोणता वारसा देणार?
मोबाईलच्या स्क्रीनवर क्षणभंगुर जग दिसते; पण पुस्तकांच्या पानांतून अखंड आयुष्य समजते. या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया - दिवसातील किमान काही वेळ वाचनासाठी देऊया. एक पुस्तक हातात घेऊया, ते मन लावून वाचूया आणि स्वतःला नव्याने घडवण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया! कारण जो वाचतो, तोच खऱ्या अर्थाने विचार करतो आणि जो विचार करतो, तोच बदल घडवून आणतो.
वाचाल तर वाचाल! जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!