गोरबंजारा साहित्यिकांच्या टोपणनावांमागचा संघर्ष, साहित्य आणि ओळखीचा इतिहास
गोरबंजारा साहित्य क्षेत्रातील तांडाकार, भीमणीपुत्र, याडीकार, भरकाडीकार, लोहगढकार अशा साहित्यिकांच्या टोपणनावांमागचा प्रेरणादायी इतिहास जाणून घ्या.
गोरबंजारा साहित्यिकाचे टोपणनावांमागे लपलेला इतिहास!
गोर बंजारा साहित्य शिवारातील साहित्यिकांचे टोपण नावामागे फार मोठा इतिहास लपलेला आहे. आजही गोर बंजारा साहित्य क्षेत्रामध्ये अनेक कवी/ लेखक टोपण नावाने ओळखू येतात. त्यांचे तेच नाव रूढ झालेले आहे. एकोणिसाव्या शतकातील गोर विचारवंत तथा विद्रोही लेखक आत्माराम कनीराम राठोड यांनी "तांडा" ही कादंबरी सर्वप्रथम लिहिली होती. तसेच गोर बंजारा समाजामध्ये सुधारणा व्हावी, जुन्या रुढी परंपरा नष्ट होऊन गोर बंजारा समाज हा फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेने पुढे जावा अशा प्रकारे त्यांनी अनेक साहित्याचे लेखन केले. त्यामुळे त्यांना आत्माराम कनीराम राठोड ऐवजी "तांडाकार" हे त्यांचे टोपण नाव पडले आणि पुढे तांडाकार म्हणूनच रूढ झालेले आहे.
त्यांच्यानंतर किनवट तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहणारे प्रतिभावंत तसेच गोर विचारवंत आदरणीय मोहन गणूजी नाईक यांनी अनेक प्रकारे गोर साहित्यामध्ये दर्जेदार पुस्तके लिहून भर टाकलेली आहे. सुरुवातीला ते मोहन गणूजी नाईक या नावानेच लिहीत होते. परंतु लहानपणा मध्येच त्यांची आई 'भीमणीयाडी' हिचा स्वर्गवास झाल्यामुळे ते पोरके झाले. त्यांचे दिवसेंदिवस लिखाण बहरत होते त्यामुळे त्यांनी आपल्या आईची आठवण कायम राहावी म्हणून त्यांनी "भीमणीपुत्र" या नावाने त्यांनी लिखाण सुरू केलेले आहे. आणि त्यांचे दर्जेदार व उच्च कोटीचे लिखाण तमाम बहुजनांना केवळ गोर बंजारा समाजालाच नाही तर तमाम बहुजनांना आवडल्यामुळे त्यांचे गोर साहित्यातच नाही तर मराठी साहित्यात सुद्धा "भीमणीपुत्र" हे नाव रूढ झालेले आहे. आज त्यांना "भीमणीपुत्र" म्हणूनच त्यांची ओळख सर्वदूर आहे. प्रा. मोतीराज राठोड यांचे लिखाण तर दर्जेदारच होते परंतु भारतीय भटके युथ फ्रंटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भटक्या विमुक्तांना जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची चळवळ फार मोठी होती. त्यामुळे त्यांनी लिखाण करताना जरी कोणतेही टोपण नाव वापरलेले नसले तरी त्यांना "भटके विमुक्त मित्र" म्हणून त्यांची ओळख सर्वदूर होती. विसाव्या शतकामध्ये पंजाब लालसिंग चव्हाण हे लेख लिहिण्याचे काम करत होते.
अशा मध्येच ११ जानेवारी २००३ रोजी अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली त्यांचे अध्यक्ष होते आंतरराष्ट्रीय लेखक भीमणीपुत्र मोहन गणोजी नाईक साहेब त्यांची आणि पंजाब चव्हाण यांची भेट झाली. भीमनी पुत्र मोहन नाईक साहेब यांनी पंजाब चव्हाण यांना एखादे पुस्तक लिहिण्याबाबत सुचित केले. त्यानुसार पंजाब चव्हाण यांनी "याडी" हे आत्मकथन लिहिले. जेव्हा ११ जानेवारी २००३ रोजी साहित्य संमेलनामध्ये "याडी" पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी आदरणीय भीमणीपुत्र मोहन नाईक साहेब यांनी आज पासून पंजाब चव्हाणची ओळख ही "याडीकार" पंजाब चव्हाण म्हणूनच करावी असे जाहीर करून टाकले तेव्हापासून पंजाब चव्हाण यांच्या मागे "याडीकार" म्हणून टोपण नाव लागलेले आहे. आणि आज त्यांना "याडीकार" म्हणूनच त्यांची सर्व दूर ओळख आहे.
काही साहित्यिक लोकांनी आपले नातेसंबंध जपण्यासाठी काही लोकांनी टोपण नावामध्ये उदाहरणात प्रा. डॉ. रमेश राठोड नागपूर यांनी "भिकरीयाडी पुत्र" असे टोपण नाव लावून आपल्या याडीला मोठेपणा दिलेला आहे. पुसदचे कवी बाबुलाल राठोड यांनी आपल्या कोरोना कवितासंग्रहाला त्यांनी "शांतीकुमार" असे टोपण नाव धारण करून आपल्या याडीच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंगोलीचे प्रसिद्ध कवी आमचे मित्र रतन आडे यांनी आपले काव्य लेखन करताना "बाळतान्हा" असे टोपण नाव धारण केलेले आहे यामागे त्यांची नम्रता दिसून येते. जांगडबुत्ता सदराखाली लिहिणारे प्रसिद्ध कवी सुरेश राठोड काटोल यांच्या कविता या माणसाला वेड लावणाऱ्या असून त्यांच्या कवितामुळे लोकांनी त्यांचे टोपण नाव "जांगडबुत्ताकार" च ठेवलेले आहे. तसेच आर्णीचे प्रसिद्ध कवी संतोष आडे यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही परंतु 'दणका' या सदराखाली ते दैनंदिन घडणाऱ्या भारतातील तमाम घटनावर असा दणका देतात की ते सर्वांनाच आवडते म्हणून रसिक लोकांनी त्यांचे टोपण नाव "दणकाकार" असेच ठेवलेले आहे. संतोष आडे आर्णी असे जर आपण म्हटले तर ते त्यांना कोणी ओळखणार नाही परंतु "दणकाकार" म्हटल्याबरोबर त्यांची ओळख पटल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत नथू गोपा चव्हाण यांनी सन २०१० मध्ये "लेंगी" नावाचा एक सांस्कृतिक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून नथू गोपा चव्हाण यांना लोक टोपण नावाने "लेंगीकार"च म्हणतात. काही दिवसानंतर तांडेल ही कादंबरी रावजी राठोड यांची प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून रावजी राठोड सरांना "तांडेल कार" अशी ओळख निर्माण झाली होती.
सन २००२ मध्ये छत्रपती संभाजी नगरचे प्रा. भाई प्रेमसिंग जाधव यांनी 'बंजारा दर्पण' नावाचे गोर बंजारा समाजातील नेत्याबाबत एक चांगले पुस्तक प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून लोक त्यांना "बंजारा दर्पणकार" म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. जालन्याचे प्रसिद्ध कवी प्रेमदास राठोड यांचा गराशा नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता आणि तो प्रचंड गाजला. त्यामुळे प्रेमदास राठोड यांना "गराशाकार" म्हणून ओळख निर्माण झाली. तसेच नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांचा 'वेदना' हे पुस्तक प्रकाशित झाले होते तेव्हा त्यांना खासदार असलेले हरिभाऊ राठोड यांनी त्यांचे टोपण नाव "वेदनाकार" म्हणून ठेवले होते आणि त्यांचा सत्कार सुद्धा केला होता. तेव्हापासून त्यांना "वेदनाकार" अशी ओळख निर्माण झालेली आहे. आर्णीचे कवी प्रेम किसन राठोड यांचा २००८ मध्ये 'केणावंट' हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासून लोक त्यांना "केणावंटकार" म्हणूनच ओळखायचे. तसेच त्याच वर्षी रा.ला. चव्हाण यांचे लमाण हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामुळे त्यांना "लमाणकार" म्हणूनच लोक ओळखतात. सन २०१३ मध्ये पीएसआय नामदेव राठोड यांचा 'वादळवाट' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आणि ते प्रचंड गाजले तेव्हापासून त्यांना लोक "वादळवाटकार" म्हणूनच ओळखायचे. प्रसिद्ध लेखक प्रा.विशेष पवार यांनी "गीतांजली" नावाचा कवितासंग्रह काढला होता. त्यामुळे त्यांना "गीतांजलीकार" म्हणूनच लोक ओळखतात. सन २०१६ मध्ये प्रा. डॉ. गणेश चव्हाण नागपूर यांचे 'भरकाडी' हा कथासंग्रह आला आणि त्यांनी मराठी साहित्यामध्ये प्रचंड धुमाकूळ घातली. त्यामुळे त्यांचे टोपण नाव "भरकाडीकार" पडले. आजही त्यांना नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये "भरकाडीकार" म्हणूनच लोक ओळखतात. तसेच २०१६ मध्ये प्रा. कैलास आनंदा पवार यांचा 'आरसा" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या कविता या प्रचंड ताकतीच्या आणि मानवी मनाला आनंद देणाऱ्या असल्यामुळे त्यांचे टोपण नाव "आरसाकार" म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्याच वर्षी डॉ. विनोद श्रीराम जाधव यांनी 'गहरा' हे प्रसिद्ध लेखक प्राचार्य ग.ह.राठोड संराच्या जीवनावर पुस्तक प्रकाशित केले त्यामुळे त्यांना लोक "गहराकार" म्हणून ओळखतात. सन २०१७ मध्ये छत्रपती संभाजी नगरचे डॉ. कृष्णा राठोड यांचा 'कोथळी' हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हापासून डॉ. कृष्णा राठोड यांना "कोथळीकार" म्हणून ओळखतात. पुढे नामदेव पवार यांचा 'बटवा' हे पुस्तक प्रकाशित झाले त्यामुळे त्यांना काही लोक "बटवाकार" म्हणून ओळखतात. सन २०१७ मध्ये गोर बंजारा साहित्यात नवी कवींची भर पडली, प्रामुख्याने लखन कुमार जाधव यांनी 'जागली' हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला तोही खूप गाजला. त्यामुळे लखन कुमार जाधव यांना "जागलीकार" म्हणून ओळख निर्माण झाली.
सन २०१८ मध्ये कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असलेले आणि प्रसिद्ध लेखक असलेले जयराम सिताराम पवार आंबेजोगाई यांचा गोर बंजारा गौरवशाली इतिहास 'लोहगढ' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आणि ते कमी वेळामध्येच ते भारतभर पोचल्यामुळे त्यांना लोक "लोहगढकार" म्हणूनच ओळखतात. त्याच वर्षी जिल्हा न्यायाधीश असलेले सोलापूरचे नामदेव चव्हाण यांनी आपले 'लदेणी' आत्मकथन प्रकाशित केल्यामुळे त्यांना सुद्धा "लदेणी कार" म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. लातूर तालुक्यातील औसा येथे मुख्याध्यापक असलेले बळीराम रूपचंद जाधव यांचे गोर धाटीर गठडी हे पुस्तक प्रकाशित झाले त्यामुळे त्यांना "गठडीकार" म्हणून लोक ओळखतात. प्रसिद्ध गोर विचारवंत तथा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले इंजिनीयर मांगीलाल राठोड यांचा 'मुनादी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला तो प्रचंड गाजला. त्यामुळे त्यांना "मुनादीकार" म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. छत्रपती संभाजी नगरचे प्रसिद्ध लेखक बी. डी. पवार यांचा 'विमुक्त' हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे त्यांना "विमुक्तकार" म्हणून लोक ओळखायचे. सन २०२० मध्ये वाकडोद गोविंद पवार यांचा वाटसप हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे ते "वाटसपकार" म्हणून ओळखल्या जातात, त्याच वर्षी गोर सिकवाडीचे प्रमुख काशिनाथ नायक यांचा 'समंळ' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि ते प्रचंड गाजले त्यामुळे त्यांना लोक "समळंकार" म्हणायचे. तसेच गणेश करमठोट जिवती यांचे 'वचारी' हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे त्यांना "वचारीकार" म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस विभागात पीएसआय म्हणून कर्तव्यदक्ष असलेले अधिकारी राहुल सिंधू पालत्या यांचा 'घुगरी घालेरो' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि ते प्रचंड गाजले त्यामुळे त्यांना "घुगरीकार" म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.
सन २०२१ मध्ये अमोल नायक चिंचखेड यांचा 'गोरपीठ' हे कविता संग्रह प्रकाशित झाले आणि ते प्रचंड गाजले मराठी साहित्याने त्याची विशेष दखल घेतलेली आहे. त्यामुळे गोरबंजारा साहित्यात अमोल नायक यांची ओळख "गोरपीठकार" म्हणून झालेली आहे. सन २०२२ मध्ये प्रसिद्ध कवी पि.के. पवार बुलढाणा यांचा 'आक्रोश' नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यामुळे त्यांची ओळख "आक्रोशकार" म्हणून झालेली आहे. तसेच दारव्याचे प्रसिद्ध कवी ओमकार राठोड यांचा 'हिंदोलो' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला त्यामुळे त्यांना लोकं "हिंदोलोकार" म्हणतात. विनोद राठोड यांचे 'झुपडी' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांना लोक "झुपडीकार" म्हणून ओळखतात. नाशिकचे प्राचार्य सलतान राठोड यांचा 'गोरमाटी' हा ऐतिहासिक संदर्भ असलेला ग्रंथ प्रकाशित झाल्यामुळे त्यांना लोक "गोरमाटीकार" म्हणून संबोधतात.
सन २०२३ मध्ये किनवटचे प्रसिद्ध साहित्यिक तथा प्रतिभावंत लेखक प्रा. डॉ. वसंत भा. राठोड यांचे 'कल्लोळ' हे आत्मकथन प्रकाशित झाले आंतरराष्ट्रीय लेखक भिमणीपुत्र मोहन नाईक साहेब यांनी ते वाचून त्यांना "कल्लोळकार"अशी पदवी दिलेली आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्याच वर्षी छत्रपती संभाजी नगरचे मुख्याध्यापक असलेले कवी मनाचे तात्याराव धोंडीराम चव्हाण यांचा "संघर्षाचं सोनं" हे आत्मकथन प्रकाशित झालं आणि कमी वेळामध्ये त्याची सर्व दूर प्रसिद्धी झाली त्यामुळे त्यांना लोक "संघर्षाचं सोनंकार" म्हणून ओळखतात.
किनवट तालुक्यातील सिंगोडाचे ७५ वर्षीय ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय मोहन भिकू पवार साहेब यांचा "जो कोणी मळो वेदेम ऊ मळो गोर हरपणीर गिदेम" हे पुस्तक प्रकाशित झाले आणि ते प्रचंड गाजले त्यामुळे त्यांना लोक 'हरपणीकार' म्हणून टोपण नावाने ओळखतात.
नांदेड जिल्हा परिषद मध्ये गटशिक्षणाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रसिद्ध लेखक मोतीराम रूपसिंग राठोड यांची 'वचपा' कादंबरी थोड्याच दिवसांमध्ये भाव खाऊन गेली आणि त्यांचे नाव "वचपाकार" म्हणून प्रसिद्ध झाले.
गोर बंजारा साहित्यातील प्रसिद्ध कवी म्हणून ओळख निर्माण झालेले प्रा. अरुण पवार परळी यांचा 'जावळ' कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि ते "जावळकार" या नावाने आज प्रसिद्ध आहे. मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी या पदावर असलेले प्रसिद्ध लेखक तथा प्रतिभावंत कवी राजाराम गो. जाधव यांचा "झामई" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि यांनी कमी वेळामध्ये गोर साहित्यात आणि मराठी साहित्यात धुमाकूळ घातली. त्यामुळे राजाराम जाधव यांना "झामाईकार" म्हणून ओळख निर्माण झालेली आहे..
अशी बरीचशी मंडळी टोपण नावाने गोर साहित्यामध्येच नाही तर मराठी साहित्यामध्ये सुद्धा ओळखल्या जातात. त्यामुळे गोरबंजारा साहित्यातील लेखक/ कवी आणि साहित्यिक लोकांच्या टोपण नावामागे फार मोठा इतिहास लपलेला आहे. अजूनही टोपण नाव असलेली बरीच लेखक मंडळी या लेखांमध्ये सुटलेली आहे ती मागेपुढे या लेखांमध्ये समाविष्ट करण्यात येईल याची सर्व लेखकांनी नोंद घ्यावी.
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद