गोरमाटी हीच आमची मायभाषा | बंजारा समाजाची आत्मओळख आणि भाषिक अस्मिता

गोरमाटी ही केवळ बोली नाही तर बंजारा समाजाची मायभाषा, सांस्कृतिक ओळख आणि पूर्वजांची स्मृती आहे. भाषा वाचवणे म्हणजे इतिहास बदलणे नव्हे, तर हरवलेला आवाज परत मिळवणे होय.

गोरमाटी हीच आमची मायभाषा | बंजारा समाजाची आत्मओळख आणि भाषिक अस्मिता

भाषा वाचवण्याच्या नावाखाली इतिहास बदलला जातो आहे, असा आरोप केला जातो; पण हा दावा स्वतः इतिहासाच्या अपुऱ्या वाचनातून उभा राहतो.

बंजारा” ही व्यापक सामाजिक ओळख आहे—याबद्दल वाद नाही. पण एवढ्यावरच इतिहास संपत नाही. समाजाच्या अंतःकरणात जपलेली आत्मओळख, परंपरा, बोली, लोकस्मृती आणि सांस्कृतिक सातत्य यांनाही तितकेच महत्त्व असते. “गोरमाटी” हा शब्द याच आत्मसंबोधनाचा केंद्रबिंदू आहे. तो आज अचानक निर्माण झालेला नाही, तर पिढ्यानपिढ्या जगलेल्या सामुदायिक स्मृतीतून आलेला आहे.

गोरमाटी” या शब्दावर प्रश्न उपस्थित करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते—इतिहासाचा पुरावा फक्त ब्रिटिश कागदपत्रांत शोधता येत नाही. ब्रिटिश सत्तेने अनेक भटक्या आणि व्यापारी समुदायांना प्रशासकीय सोयीसाठी मोठ्या गटांत वर्गीकृत केले. ती प्रशासनाची भाषा होती; समाजाच्या आत्मभानाची नव्हे. म्हणून ब्रिटिश अभिलेखात एखादे नाव ठळक दिसते म्हणून तेच अंतिम सत्य ठरत नाही.

भाषेचे अस्तित्व केवळ एखाद्या जुन्या पुस्तकातील नोंदीवर ठरत नाही. भाषा लोकांच्या जगण्यातून सिद्ध होते—घरात, तांड्यात, ढावलौ,हवली गीतांत, वळंग,होळी,दिवाळी,दसराव सन तेवार तिज मध्ये, लोककथांमध्ये, विवाहसंस्कारांत, देवधर्मात आणि दैनंदिन व्यवहारात. ज्या भाषेत समाजाने आपले दुःख, आनंद, संघर्ष आणि अस्मिता जपली, त्या भाषेच्या अस्तित्वाला “कृत्रिम नामकरण” म्हणून नाकारणे वास्तवापासून दूर आहे.

आज गोरमाटीचा उच्चार वाढतो आहे, कारण समाज स्वतःच्या मूळांकडे परत पाहू लागला आहे. सोशल मीडिया, साहित्य, संमेलने, शब्दकोश आणि जनगणना यांत हा आग्रह दिसतो, याचा अर्थ इतिहास पुसला जातो असा नाही; उलट दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या सांस्कृतिक स्मृतीला आवाज मिळत आहे.

संपूर्ण जग आम्हाला बंजारा म्हणून ओळखते” हे खरे आहे. पण बाहेरची ओळख आणि आतली आत्मओळख यात विरोध नसतो. जगाने “बंजारा” म्हणून ओळखले म्हणून घरच्या मातृस्वराला विसरायचे का? व्यापक सामाजिक नाव आणि मूळ सांस्कृतिक नाव एकत्र नांदू शकतात—इतिहासाचे हेच वास्तव आहे.

म्हणून “गोरमाटी” पुढे येणे म्हणजे “बंजारा” मागे जाणे नव्हे. हा स्पर्धेचा प्रश्न नाही; हा स्मृती, अस्मिता आणि भाषिक स्वाभिमानाचा प्रश्न आहे.
स्पष्ट सांगायचे तर—गोरमाटी ही केवळ शब्दरचना नाही. ती आपल्या मातीतून आलेली वाणी आहे. ती आपल्या पूर्वजांच्या स्मृतीची शिदोरी आहे. ती आपल्या समाजाच्या आत्म्याचा स्वर आहे.
भाषा वाचवणे म्हणजे इतिहास बदलणे नाही; इतिहासाला त्याचा हरवलेला आवाज परत देणे होय. आणि म्हणूनच गोरमाटी ही केवळ बोली नाही—ती आपली मायभाषा, आपली सांस्कृतिक भूमी आणि आपली ओळख आहे.

गोस्तावाळो
गोर बंजारा भाषा बचाओ समिती