वन नेशन वन कॅटाग्री : बंजारा समाजासाठी वास्तव की फसवणूक? | गोरमाटी भाषा आणि जनगणना

जनगणनेत ‘बंजारा’ नोंदवल्याने राष्ट्रीय स्तरावर अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश होईल का? गोरमाटी भाषेची स्वतंत्र ओळख, जात-भाषा जनगणना आणि घटनात्मक वास्तव यावर सविस्तर विश्लेषण.

वन नेशन वन कॅटाग्री : बंजारा समाजासाठी वास्तव की फसवणूक? | गोरमाटी भाषा आणि जनगणना

वन नेशन वन कॅटाग्री ही एक शुद्ध फसवणूक..?

गोरमाटी भाषिक बंधू-भगिनींनो..!

जनगणनेत आपली जात ‘बंजारा’ अशी नोंदविल्याने राष्ट्रीय पातळीवर बंजारा समाजाचा संविधानातील अनुसूचित जमात या एकाच प्रवर्गात समावेश होईल, याची कोणतीही निश्चित शाश्वती देता येत नाही. त्यामुळे “वन नेशन वन कॅटाग्री” ही संकल्पना वास्तवापेक्षा भ्रम निर्माण करणारी ठरू शकते.

भारतामध्ये सध्या सात राज्यांत बंजारा समाजाला स्थानिक जातींच्या नामकरणानुसार अनुसूचित जात किंवा अनुसूचित जमात अशी संविधानिक ओळख प्राप्त झालेली आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांतील समाज पुन्हा नव्याने फक्त बंजारा म्हणून नोंद करेल, ही अपेक्षा वास्तववादी नाही. उलट अशा प्रकारचा आग्रह धरणे हे अज्ञानाचे लक्षण ठरू शकते.

ज्या राज्यांत बंजारा समाजाला अद्याप अनुसूचित जमात प्रवर्गाची मान्यता नाही, त्या राज्यांतील बांधवांनी जनगणनेत बंजारा अशी नोंद केली तरी भविष्यात त्यांचा समावेश एकाच अनुसूचित जमात प्रवर्गात होईल, याची हमी देता येत नाही. कारण त्यासाठी केवळ जनगणना पुरेशी नसून घटना दुरुस्ती आणि विविध राज्य सरकारांच्या शिफारशी आवश्यक असतात.

अनुसूचित जाती-जमातींच्या याद्या या केंद्रीय स्तरावर नव्हे, तर राज्यनिहाय ठरवल्या जातात. राज्य सरकारांच्या शिफारशींनुसारच संबंधित प्रवर्गांना संविधानिक मान्यता दिली जाते. त्यामुळे या विषयातील घटनात्मक गुंतागुंत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जात, भाषा आणि धर्मनिहाय जनगणना झाली तर...?

जर जनगणना फॉर्ममध्ये ‘मातृभाषा’ हा स्वतंत्र रकाना असेल, तर त्या ठिकाणी आपल्या मातृभाषेची नोंद गोरमाटी अशी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर गोरमाटी भाषेचा स्वतंत्र भाषिक डेटा तयार होईल आणि भविष्यात या बोलीभाषेला संविधानिक मान्यता मिळविण्याचा मार्ग अधिक मजबूत होऊ शकतो.

जर गोरमाटीची स्वतंत्र नोंद झाली नाही, तर ती पुन्हा इतर भाषांच्या छत्राखाली वर्गीकृत होण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेत बंजारी, लंबाडी, लंबानी, सुगाली आणि गोरबोली यांसारख्या नावांचा हिंदी भाषेच्या शेड्यूलमध्ये समावेश झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावेळी ‘गोरमाटी’ या नावाने स्वतंत्र नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जाती-जमातींची जात, भाषा आणि धर्मनिहाय जनगणना होत आली आहे. मात्र ओबीसी समाजाची अशा प्रकारची सविस्तर जनगणना झाल्याचे विशेष ऐकिवात नाही. त्यामुळे यावेळीही ओबीसींची स्वतंत्र भाषा-जातनिहाय गणना होईलच, याची खात्री देता येत नाही.

म्हणूनच —
बंजारा’ या एकाच नावाने संपूर्ण देशभर एकच अनुसूचित जमात प्रवर्ग मिळेल, ही अवास्तव आणि खुळचट कल्पना मनातून काढून टाकणे आवश्यक आहे.

भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक