गोर बंजारा साहित्य अकादमीचा प्रेरक इतिहास - पंजाबराव चव्हाण

गोर बंजारा साहित्य अकादमीचा इतिहास, स्थापना, उद्दिष्टे आणि बंजारा भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी झालेल्या संघर्षाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

गोर बंजारा साहित्य अकादमीचा प्रेरक इतिहास - पंजाबराव चव्हाण

गोर बंजारा साहित्य अकादमीचा प्रेरक इतिहास

[ गोर बंजारा साहित्य अकादमीच्या स्थापनेचा इतिहास हा बंजारा भाषेतील समृद्ध मौखिक परंपरा, लोककला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या दीर्घ संघर्षाची यशोगाथा आहे.
भविष्यात बंजारा साहित्य, संस्कृती ,भाषा व कलेसाठी अकादमी एक ऐतिहासिक ठरणार असून या ऐतिहासिक अकादमीसाठी विशेष योगदान देणारे गोर बंजारा साहित्य अकादमीचे जनक एकनाथ पवार यासह या प्रवासातील सर्व शिलेदारांचा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोड यासह माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे देखील नाव बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जातील‌.]

राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. गोर बंजारा भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रोत्साहन आणि बंजारा भाषेतील वाड्.मयीन कृती प्रकाशित करण्यास तरतूद असावी यासाठी सर्वप्रथम त्यांनी  स्वतंत्र अकादमीची संकल्पना मांडली.‌ त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले होते. वैभवशाली संस्कृती जोपासणाऱ्या बंजारासाठी बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती , कलांचे संवर्धन व्हावे. इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे. भारतीय विविधतेत बंजारा साहित्य संस्कृतीची प्रचिती यावी,  बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी स्वतंत्र गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन व्हावी यासाठी श्रीक्षेत्र पोहरागड, भक्तीधाम येथे सन २०१५ मध्ये पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी विशेष करून उद्योजक तथा समाजसेवी किसनराव राठोड यांनी पुढाकार घेऊन उपस्थित सर्व मान्यवराच्या आदरातिथ्याची व्यवस्था केली होती‌. काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना येता आले नाही म्हणून त्यांनी समाजसेवी ॲड.पंडीत राठोड यांना पाठविले होते. सभेत बंजारा साहित्य संस्कृतीचे अभ्यासक तथा साहित्यिक एकनाथराव पवार यांनी बंजारा अकादमीची संकल्पना मांडून उद्दिष्टे, प्रारुप व स्वरूप मांडले होते. या प्रारुपवर ज्येष्ठ प्रबोधनकार प्रेमदास महाराज वनोलीकर, महंत जितेंद्र महाराज, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मोतीराज राठोड आणि ज्येष्ठ साहित्यिक पंजाबराव चव्हाण, बाबूसिंह नाईक, विलासभाऊ राठोड यांनी अभिमत मांडून सहमती दर्शवली होती.  या पायाभरणीच्या सभेला साहित्य संस्कृती  क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.  यावेळी अकादमीच्या उद्दिष्टावर विस्तृत चर्चा करून शासन स्तरावर अकादमी स्थापन करण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. पुढे अकादमीसाठी साहित्यिक एकनाथ पवार यांनी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती.  साहित्यिक एकनाथ पवार यांनी संकल्पना ,पायाभरणी, पाठपुरावा आणि प्रसार या चौफेर पातळीवर योगदान दिल्याने गोर बंजारा साहित्य अकादमीचे खऱ्याअर्थाने ते शिल्पकार ठरले. ऐतिहासिक नगारा वास्तू संग्राहालय भूमीपूजनाचा सोहळा ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. या निमित्ताने अकादमीसाठी अतिशय सुंदर योग जुळून आले. ज्या पोहरागडला बंजारा अकादमीची संकल्पना, पायाभरणी झाली.  मान्यवरांचे अभिमत मिळाले होते त्याच पवित्र ठिकाणी लाखोंच्या जनसागरापुढे तत्कालीन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक,  मंत्री ना. पंकजा मुंडे, मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार , मंत्री ना.दादासाहेब भूसे , आमदार हरिभाऊ राठोड यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी  महोदयांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. हा दिवस खरंतर सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण ठरला. बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी ही एक गौरवपूर्ण बाब म्हणता येईल.

•अकादमीसाठी मुख्यमंत्री व राज्यपालांची भेट

अकादमी स्थापनेच्या घोषणेनंतर देखील अकादमी साठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. तत्कालीन आमदार हरिभाऊ राठोड आणि आमदार राजेश राठोड यांनी विधानपरिषदेत अकादमीचा मुद्दा देखील मांडला होता. त्यामुळे अकादमी विषयी साहित्य वर्तुळात चर्चाही होत असे. सिंधी, गुजराती अकादमीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे बंजारा अकादमी स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते‌. दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि या अकादमीचे संकल्पक साहित्यिक एकनाथ पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बंजारा भाषेला दर्जा , संवर्धन आणि बंजारा अकादमीसाठी भेटही घेतली. त्यावेळी मी बेलापूर ठाणे येथे होतो, काही तांत्रिक कारणांमुळे मला निवेदनासाठी जाता आले नाही, परंतु माझी सदिच्छा त्यांच्यासोबत होती. अकादमी संदर्भात माझी नेहमी त्यांच्याशी चर्चा होत असे.   सहा -सात वर्ष उलटली परंतु अकादमी स्थापनेला मुहूर्त लाभत नव्हता‌. लोकप्रतिनिधी म्हणून ना. संजय राठोड स्वतः बंजारा संस्कृती आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भाने शासन दरबारी प्रयत्नशील राहिले. अकादमी साठी सातत्याने प्रयत्नशील रहावे लागले. अखेर राज्य सरकार द्वारा १६ मार्च २०२४ रोजी  गोर बंजारा अकादमी स्थापन करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय  सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी घेतला. गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा शासन निर्णय येताच प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनाच नव्हे तर साहित्य वर्तुळातील साहित्यिक , कवी , लेखक  , समिक्षक, विचारवंत, नाटककार, गितकार या सर्वांना हर्ष झाला. विशेष म्हणजे अकादमी स्थापनेत ज्यांचा ज्यांचा पुढाकार होता त्या सर्व शिलेदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलेला शाश्वत मंच मिळण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी अकादमीची जी संकल्पना मांडली होती, ते प्रत्यक्षात अवतरल्याचे आनंद होणे स्वाभाविकच होते. कारण बंजारा अकादमी ही बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी एक ऐतिहासिक ठेवा ठरली‌. गोर बंजारा बंजारा साहित्य अकादमीच्या रुपाने बंजारा समाजाला एक स्वर्णिम भेट मिळाली. हे विशेष.

• गोर बंजारा अकादमीची प्रेरक उद्दिष्टे

राज्यातीलबहुभाषिकांच्या म्हणजेच मराठी भाषिकांचे संस्कृती, साहित्य, भाषा व लोकजीवनाशी सुसंवाद साधून सांस्कृतिक  सुसंवाद साधण्याची कला या भाषिकांना  अल्पसंख्यांकांना अवगत व्हावे.  गोर बंजारा भाषा, साहित्य, कला व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणे. गोर बंजारा भाषा, साहित्य आणि कला क्षेत्रातील  व्यक्तींना पुरस्कृत करणे. गोर बंजारा भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे. गोर बंजारा भाषेतील वाड्.मयीन कृती प्रकाशीत करण्यास सहाय्य करणे. गोर बंजारा  भाषिक अल्पसंख्याकांनी केवळ त्यांच्या भाषेतील कार्यक्रम आयोजित करुन मर्यादित सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांच्या भाषेतील कार्यक्रमांसोबतच मराठी व इतर भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यामध्ये मराठी  भाषिकांनाही सहभागी करुन सामाजिक सुसंवाद निर्माण करणे. तसेच गोर बंजारा या भाषेसोबतच मराठी भाषेतही परीसंवाद, चचासत्रे, कवीसंमेलने आयोजन करणे. अशी महत्वपूर्ण उद्दिष्टे महाराष्ट्र राज्य गोर बंजारा अकादमीची आहे. भविष्यात बंजारा साहित्य, संस्कृती ,भाषा व कलेसाठी अकादमी एक ऐतिहासिक ठरणार असून या ऐतिहासिक अकादमीसाठी विशेष योगदान देणारे गोर बंजारा साहित्य अकादमीचे जनक एकनाथ पवार यासह या प्रवासातील सर्व शिलेदारांचा नाव बंजारा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जातील‌. बंजारा भाषा साहित्य संस्कृती व कलेला अकादमीच्या माध्यमातून एक  स्वर्णिम भविष्य लाभेल असा आशावाद या निमित्ताने दिसून येते.

  -ज्येष्ठ साहित्यिक,  पंजाबराव चव्हाण