“जीवन संघर्ष” पुस्तक समीक्षा | डॉ. अंबादास जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी प्रवास

‘जीवन संघर्ष’ या आत्मकथेची सविस्तर पुस्तक समीक्षा. डॉ. अंबादास खेमा जाधव यांच्या संघर्ष, कर्तव्यनिष्ठा, माणुसकी आणि पशुसंवर्धन विभागातील संवेदनशील सेवाप्रवासाचे प्रभावी चित्रण. समीक्षा - याडीकार पंजाबराव चव्हाण.

“जीवन संघर्ष” पुस्तक समीक्षा | डॉ. अंबादास जाधव यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी प्रवास

पशुसंवर्धन खात्यातील संवेदनशील माणसाची गोष्ट – “जीवन संघर्ष”

लेखक ✍️ डॉ. अंबादास खेमा जाधव

(पशुधन विकास अधिकारी)

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

समीक्षक ✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद


“म लियु ये धरती रो नाम… जेरे पच बोलीयु गिद..!”

गोर बंजारा समाजाच्या गौरवशाली परंपरेत हे गीत अत्यंत लोकप्रिय आहे. या गीतातून गोरमाटी समाजाचा निसर्गाशी असलेला अतूट संबंध आणि प्राणीमात्रांप्रती असलेले प्रेम अधोरेखित होते. गाई-गुरांसोबत लदणी करणारा हा समाज पशुप्रेमासाठी ओळखला जातो. याच समाजातील डॉ. अंबादास खेमा जाधव यांना पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्य करताना प्राणीसेवेची संधी मिळाली आणि त्या अनुभवांचे त्यांनी “जीवन संघर्ष” या आत्मकथेत प्रभावी शब्दांकन केले आहे.

ही आत्मकथा वाचताना मी अक्षरशः भारावून गेलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही संकटांशी झुंज देत शिक्षण पूर्ण करून त्यांनी यशाचे शिखर गाठले. त्यामुळेच “जीवन संघर्ष” ही केवळ आत्मकथा राहत नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या माणसाच्या जिद्दीचा दस्तऐवज बनते.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हिराबोरी तांड्यातील हलाखीच्या परिस्थितीत लेखकाचे बालपण गेले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने प्रचंड कष्ट उपसत मुलाला शिकवले. मोलमजुरी, उपाशीपोटी काढलेल्या रात्री, आणि संसाराचा डोंगर पेलतानाही “माझा मुलगा मोठा साहेब झाला पाहिजे” ही तिची जिद्द कधी कमी झाली नाही. त्या आईच्या संघर्षामुळेच डॉ. अंबादास जाधव घडले.

महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात श्री. रामराव खेमा नाईक पवार यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली. म्हणूनच लेखक प्रामाणिकपणे नमूद करतात – “आईने शिक्षणाचा पाया रचला आणि मामांच्या मदतीमुळे मी घडलो.” ही कृतज्ञतेची भावना आत्मकथेला अधिक जिवंत बनवते.

या पुस्तकातील अनेक प्रसंग डोळ्यात अश्रू आणणारे आहेत. १९७२ चा दुष्काळ, पोट भरण्यासाठी जन्मभूमी सोडून परप्रांतात जावे लागलेली वेळ, आई-वडिलांनी सोसलेल्या वेदना — हे सर्व वाचताना वाचक भावनिक होतो. लेखकाने कोणताही आडपडदा न ठेवता साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेत आपले जीवन मांडले आहे.

“जीवन संघर्ष” ही केवळ डॉ. अंबादास जाधव यांची कथा नाही, तर तांड्यातील हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन मोठे झालेल्या तमाम अधिकाऱ्यांची सामूहिक कहाणी आहे. यापूर्वी “तांडा”, “याडी”, “वादळवाट”, “लदणी”, “अंधारयात्रीचे स्वप्न”, “संघर्षाचं सोनं” अशा अनेक आत्मकथांनी गोर साहित्य समृद्ध केले; मात्र “जीवन संघर्ष” ही त्यांच्यापेक्षा वेगळ्या धाटणीची आणि अंतर्मुख करणारी आत्मकथा आहे.

लेखकाच्या आयुष्यात अनेक संकटे आली, पण त्यांनी कधी हार मानली नाही. प्रत्येक प्रसंगातून शिकत पुढे जाण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे. जीवनातील यश-अपयश, चढ-उतार, वेदना आणि आनंद यांचे त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने वर्णन केले आहे. हेच या आत्मकथेचे खरे यश आहे.

गोर बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. सिंधू संस्कृतीच्या विनाशानंतर आणि १८७१ च्या गुन्हेगार जमातीच्या काळ्या कायद्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. पण वसंतराव नाईक यांच्या आरक्षण धोरणामुळे समाज पुन्हा स्थिरावू लागला. अशा काळात लेखकाच्या आईने संसारासाठी जंगलातून मोहफुले गोळा करून संसार चालवला. त्या आईची जिद्द, त्याग आणि प्रेम या आत्मकथेची खरी शक्ती आहे.

लेखकाने स्वतःच्या भावंडांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी मोठा त्याग केला. स्वतः नोकरीत स्थिरावल्यानंतरही त्यांनी कुटुंबाला विसरले नाही. लहान भावासाठी कर्ज काढून किराणा दुकान सुरू करून दिले. आजच्या काळात अनेक अधिकारी कुटुंबापासून दूर जातात; पण डॉ. अंबादास जाधव यांनी आपल्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. हे त्यांचे मोठेपण आहे.

पशुसंवर्धन विभागात त्यांनी अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदार अधिकारी म्हणून काम केले. त्यांनी नोकरी केवळ पगारासाठी केली नाही, तर ती समाजसेवेची जबाबदारी मानली. गरीब असो किंवा श्रीमंत — प्रत्येकाशी समानतेने वागण्याची त्यांची वृत्ती होती. माणुसकीची ज्योत कायम प्रज्वलित ठेवणारा हा अधिकारी आपल्या कार्यातून लोकांच्या मनात घर करून गेला.

“शासकीय सेवेत नियुक्ती” आणि “सेवानिवृत्ती” या प्रकरणांमधून त्यांच्या कार्यजीवनाचा प्रभावी प्रवास दिसतो. त्यांनी अनेक तरुणांना शिक्षणाच्या मार्गावर आणले, वैचारिक दारिद्र्यातून बाहेर काढले आणि समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही आत्मकथा म्हणूनच प्रेरणादायी ठरते.

लेखकाच्या लेखनात संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसते. अधिकारी असूनही सामान्य माणसांशी त्यांनी जपलेली आत्मीयता हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे. पशुधन विकास अधिकारी म्हणून त्यांनी प्राण्यांशीही केवळ डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने व्यवहार केला.

या आत्मकथेत अनेक ठिकाणी बंजारा बोलीभाषेचा वापर आढळतो. त्यामुळे लेखकाचे गोरमाटी संस्कृतीवरील प्रेम अधोरेखित होते. बालपणापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा संघर्षमय प्रवास इतका प्रभावीपणे मांडलेला आहे की वाचक प्रत्येक पानाशी भावनिकरित्या जोडला जातो.

“जीवन संघर्ष” ही आत्मकथा केवळ एका अधिकाऱ्याची कहाणी नाही; ती मानवी मूल्ये, संघर्ष, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि प्रामाणिक जगण्याचा शोध घेणारी एक उत्कृष्ट कलाकृती आहे. समाजासाठी जिव्हाळ्याने झटणाऱ्या एका संवेदनशील माणसाच्या अंतरंगाचा हा उज्ज्वल आरसा आहे.

लेखक डॉ. अंबादास जाधव यांच्या पुढील साहित्य वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!


ग्रंथ परिचय

  • ग्रंथाचे नाव: जीवन संघर्ष (आत्मकथा)
  • लेखक: डॉ. अंबादास खेमा जाधव
  • प्रकाशक: अविरत प्रकाशन, नांदेड
  • प्रकाशन दिनांक: २२ डिसेंबर २०२५
  • पृष्ठसंख्या: १७२
  • किंमत: ₹२२०

समीक्षक ✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद