नगारा: बंजारा भाषेतील वैश्विक महाकाव्य | साहित्यिक एकनाथराव पवार नायक

प्रख्यात साहित्यिक एकनाथराव पवार नायक लिखित 'नगारा' हे महाकाव्य बंजारा साहित्यातील एक मैलाचा दगड आहे. 'One Earth-One Family' या वैश्विक संकल्पनेवर आधारित या ग्रंथाचा आढावा.

नगारा: बंजारा भाषेतील वैश्विक महाकाव्य | साहित्यिक एकनाथराव पवार नायक

'नगारा' : बंजारा भाषेतील मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार

प्रख्यात साहित्यिक, विचारवंत आणि कवी एकनाथराव पवार नायक लिखित 'नगारा' हे महाकाव्य बंजारा साहित्य विश्वातील एक मैलाचा दगड ठरले आहे. केवळ एका समुदायापुरते मर्यादित न राहता, वैश्विक मानवी मूल्यांचे संवर्धन करणारे एक अभिजात महाकाव्य म्हणून या कृतीची ओळख निर्माण झाली आहे. तेलंगणा येथील पद्मश्री सोमलाल नायक आणि गुजरातचे प्रख्यात साहित्यिक डॉ. गोवर्धन बंजारा यांसारख्या मान्यवरांनी या ग्रंथातील साहित्यप्रभा आणि मूल्यप्रज्ञेची पाठराखण केली आहे.

प्रतीकात्मकता आणि सांस्कृतिक वारसा

'नगारा' हे शीर्षक केवळ वाद्य नव्हे, तर ते ऊर्जा, न्याय, विजय, संघर्ष आणि शौर्याचे प्रतीक आहे. गौर बंजारा संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या या वाद्याचा ऐतिहासिक संदर्भ घेऊन कवीने मानवी चेतनेला जागृत करणारे काव्य रचले आहे. बंजारा साहित्याला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात या ग्रंथाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

'एक धरती, एक परिवार' : वैश्विक संकल्पना

या महाकाव्याचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यातील 'One Earth-One Family' ही संकल्पना. कवीने बंजारा समाजाच्या वैभवशाली शब्दांचा वापर करून जागतिक शांतता आणि मानवी कल्याणाचा संदेश दिला आहे. उपेक्षितांच्या आवाजाचे जागतिकीकरण आणि विश्वबंधुत्वाचा निनाद हे 'नगारा'चे मुख्य वैशिष्ट्य आहे.

"म आब सावध वेतांळी पेरणी करेवाळो छू..."

कवीने येथे आधुनिकतेने 'माणूस पेरणी' करण्याचा निर्धार केला आहे. द्वेष, दहशत आणि हिंसेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 'ह्युमन व्हर्जन'चा बुस्टर डोस देण्याची भाषा कवी करतो. संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जगाला बाहेर काढण्यासाठी 'माणूस बनविणारे विचार' पेरत राहण्याचा हा ध्यास प्रेरणादायी आहे.

नदी आणि संस्कृतीचा संगम

कवीची दृष्टी केवळ तांड्यापुरती मर्यादित नाही, ती वैश्विक आहे. सह्याद्री, हिमालय ते विंध्याद्रीपर्यंत आणि गंगा, सिंधूपासून थेट नाईल, थेम्स आणि मिसिसीपीपर्यंत हे काव्य प्रवाहित होते. तक्षशिला विद्यापीठापासून ऑक्सफर्ड आणि प्रिस्टनपर्यंतचा वेध घेत 'नगारा' जागतिक नागरिकत्वाची (Global Citizen) जाणीव करून देतो.

जीवनदर्शन आणि वास्तव

"चमकेती बाटी मळेनी. रोवं जेती केनी राज मळेनी." - या मार्मिक शब्दांत कवीने जीवनाचे कठोर वास्तव मांडले आहे की, घाबरल्याने भाकर मिळत नाही आणि रडल्याने सत्ता मिळत नाही.

लाखा बंजारा यांच्या प्रतीकातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडताना कवी म्हणतो:

"इ लाखा बंजारारो टांडो... लाखा थांबेवाळो कोनी..."

हा न थांबणारा प्रवास आणि मानवी अस्तित्वाचे विज्ञान अतिशय हृदयस्पर्शी अलंकारांनी या काव्यात गुंफले आहे.

निष्कर्ष

'नगारा' हे केवळ शब्दांचे लेणे नसून एक वैचारिक अधिष्ठान आहे. संकुचित राष्ट्रवाद किंवा सांप्रदायिकवादाच्या पलीकडे जाऊन 'वसुधैव कुटुंबकम'ची मांडणी करणारे हे आधुनिक 'शांततासूक्त' आहे. येणाऱ्या पिढ्यांना माणुसकीची शिकवण देणारा आणि अमानवीय वृत्तीला इशारा देणारा हा ग्रंथ बंजारा साहित्यातील एक अढळ रत्न ठरले आहे.

- शिव कुमार नाईक